स्वच्छ भारत अभियानाला चोरांचा सुरुंग!

मनपाने लावलेल्या १,२०० पैकी निम्म्या स्टील डस्टबिन चोरीला. केवळ सांगाडे शिल्लक, मनपा करणार नव्याने सर्वेक्षण

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
प्रणव सातोकर  
नागपूर 
nmc nagpur शहरात सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत 'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या चकचकीत स्टीलच्या कचरापेट्यांवर (डस्टबिन) चोरांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर महानगरपालिकेने शहरातील प्रमुख मार्गांवर अंदाजे १,२०० हून अधिक स्टील डस्टबिन बसवल्या होत्या; मात्र त्यापैकी निम्म्याहून अधिक डस्टबिन चोरीला गेल्याने शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मनपा प्रशासनाने थेट पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.
 
nmc 11
शहरातील बहुतांश प्रमुख चौक व वर्दळीच्या मार्गांवर पूर्वी लावलेल्या कचरापेट्या आता गायब झाल्या असून, त्या ठिकाणी केवळ लोखंडी स्टॅण्डचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. या कचरापेट्या मनपाने दुरुस्तीसाठी काढल्या की चोरीला गेल्या, असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. अखेर उपआयुक्तांनीच चोरीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याने महापालिकेच्या सुरक्षिततेवर आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत चौक, बजाजनगर, धंतोली, सीताबर्डी यांसारख्या अतिवर्दळीच्या भागात कचरा टाकण्यासाठी डस्टबिनच उपलब्ध नसल्याने नागरिक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, कचरा थेट फूटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला फेकला जात आहे. व्यापारी वर्ग दुकानातील कचरा काळ्या पिशव्यांमध्ये भरून कोपऱ्यात ठेवण्यास भाग पडत आहे. स्वच्छता कर्मचारी नियमित कचरा उचलत असले, तरी तात्पुरत्या कचरापेट्या नसल्याने शहरात पुन्हा अस्वच्छतेचे साम्राज्य पसरू लागले आहे.

nmc 22
सार्वजनिक मालमत्तेची ही लूट केवळ मनपाचे आर्थिक नुकसान नसून शहराच्या स्वच्छतेवर झालेला आघात आहे. आता नव्याने डस्टबिन बसवताना त्या चोरीला जाऊ नयेत म्हणून मनपा कोणती खबरदारी घेणार आणि पोलीस या चोरांच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
"शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंदाजे १,२०० स्टील डस्टबिन लावण्यात आल्या होत्या, त्यापैकी मोठ्या प्रमाणात कचरापेट्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी मा.पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले असून सर्व झोन आयुक्तांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तात्काळ 'एफआयआर' (FIR) नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात लवकरच सर्वेक्षण पूर्ण करून नव्याने डस्टबिन बसवल्या जातील."

राजेश भगत, उपआयुक्त,घनकचरा विभाग नागपूर महानगरपालिका