महाराष्ट्राला केंद्राची दिवाळी भेट; ७ हजार कोटींचा निधी!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
7,022 crore for Maharashtra दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने राज्यांना कर हस्तांतरणाचा आगाऊ हप्ता जारी केला असून, एकूण १ लाख ९ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या निधीमुळे राज्यांना विविध विकासकामांना गती देण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला ७,०२२ कोटी रुपये आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. सणाच्या आधी मिळालेल्या या निधीमुळे राज्यांच्या आर्थिक नियोजनाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
 
 
 
7,022 crore for Maharashtra
 
 
राज्यनिहाय वाटपाचा विचार करता उत्तर प्रदेशला सर्वाधिक १९,२०८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापाठोपाठ बिहारला १०,८४५ कोटी रुपये, मध्य प्रदेशला ८,०१० कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला ७,८६६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपये मिळाले असून राजस्थानच्या वाट्याला ६,४६० कोटी रुपये आणि ओडिशाला ४,८१९ कोटी रुपये आले आहेत. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आंध्र प्रदेशला ४,५९७ कोटी रुपये, कर्नाटकला ४,५०४ कोटी रुपये, तामिळनाडूला ४,४६६ कोटी रुपये, केरळला २,५९७ कोटी रुपये आणि तेलंगणाला २,३७० कोटी रुपये मिळाले आहेत. पश्चिम भारतातील गुजरातला ४,०९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत, तर गोव्याला ३९८ कोटी रुपये मिळाले आहेत.
 
इतर राज्यांमध्ये छत्तीसगडला ३,६०२ कोटी रुपये, हरियाणाला १,४८४ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला ९९६ कोटी रुपये, झारखंडला ३,६६० कोटी रुपये, पंजाबला २,१७६ कोटी रुपये आणि उत्तराखंडला १,२४४ कोटी रुपये मिळाले आहेत. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आसामला ३,५५२ कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशला १,४७६ कोटी रुपये, मणिपूरला ६८२ कोटी रुपये, मेघालयला ६८८ कोटी रुपये, मिझोरमला ६१५ कोटी रुपये, नागालँडला ५२४ कोटी रुपये, सिक्कीमला ३६५ कोटी रुपये आणि त्रिपुराला ६९९ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. केंद्राकडून जाहीर झालेल्या या कर हस्तांतरणामुळे देशातील सर्व राज्यांना विकासकामांसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.