अफगाणिस्तानचा ऐतिहासिक धमाका!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
हाँगकाँग,
afghanistans-historic-blast क्रिकेटविश्वात अफगाणिस्तानच्या संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अफगाणिस्तानने पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले. १ नोव्हेंबर रोजी मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर झालेल्या या सामन्यात गुलबदिन नायबच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
 
afghanistans-historic-blast
 
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत चार गडी गमावून ११५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर विजयासाठी ११६ धावांचे आव्हान होते. मात्र, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत अवघ्या ५.१ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले आणि पहिल्यांदाच स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
 
अफगाणिस्तानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो इम्रान नझीर. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात अडखळत झाली. करीम जन्नत १५ धावा करून बाद झाला, तर कर्णधार गुलबदिन नायबला १७ धावांवर माघारी परतावे लागले. मात्र, त्यानंतर इम्रान नझीरने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्रच पालटले. त्याने अवघ्या १४ चेंडूंत नाबाद ५३ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने सात उत्तुंग षटकार आणि दोन चौकार लगावले.
 
दुसऱ्या बाजूने फरमाउल्लाह सैफीने २६ धावांचे योगदान दिले. या दोघांनी मिळून तिसऱ्या गड्यासाठी अवघ्या २१ चेंडूंत ८७ धावांची नाबाद भागीदारी उभारली. त्यांच्या तुफानी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने संपूर्ण स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. गट फेरीत दक्षिण आफ्रिकेला तीन गडी राखून पराभूत करत त्यांनी मोहिमेची दमदार सुरुवात केली. त्यानंतर ओमानवर चार गडी राखून मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत स्कॉटलंडला २१ धावांनी पराभूत करत अफगाणिस्तानने अंतिम फेरी गाठली. अखेर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवून संघाने ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घातली.