नाशिक,
Ajay-Atul to promote Kumbh Mela नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्यासाठी विशेष संगीत उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी या सोहळ्यासाठी खास ‘कुंभगीत’ तयार केले असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या गीताचे अनावरण करण्यात आले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे गीत सादर करण्यात आले आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व, भक्तिभाव आणि सांस्कृतिक परंपरा संगीताच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची महती आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांचा ऐतिहासिक वारसा संगीतबद्ध करण्यासाठी अजय-अतुल यांनी कुंभमेळा प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या गीताच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाची उत्सुकता वाढवणारी झलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखवली होती. त्यांनी अजय-अतुल यांच्या मुंबईतील रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट दिली आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ‘भक्तीमय सुरांचा आनंद सोहळा.. काय असेल? ओळखू शकाल?’ असे कुतूहल निर्माण करणारे शब्द त्यांनी या व्हिडिओसोबत लिहिले होते.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रचारासाठी केवळ अजय-अतुल यांचे मुख्य गीत तयार करून न थांबता एकूण पाच गीते साकारण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील उर्वरित चार गीते अन्य संगीतकार आणि स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने तयार केली जाणार आहेत. त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील गायक, गीतकार, वादक तसेच संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठसा जागतिक स्तरावर उमटवण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे.