भारताचे पाकिस्तान केले!

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
allegations against the Election Commission दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या ‘चलो दिल्ली’ मोर्चादरम्यान काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना त्यांनी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता संपुष्टात आल्याचा आरोप केला. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशातील निवडणुका गैरप्रकारांच्या माध्यमातून जिंकल्या जात असल्याचा दावा मसूद यांनी केला. ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल, अन्यथा न्यायालय त्यांच्याकडून राजीनामा घेईल, असे वक्तव्यही त्यांनी केले. निवडणूक आयोगाची पूर्वी जगभरात प्रतिष्ठा होती; मात्र आता जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील निवडणूक व्यवस्थेची प्रतिमा खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
 
masud
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मसूद यांनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली. ‘हिंदुस्थानलाही पाकिस्तान बनवले’, असे म्हणत पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी घडत होत्या, त्याच प्रकारच्या गोष्टी भारतातही सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, पटेल पंतप्रधान असते तर मोदी यांचा जन्मही झाला नसता. पटेल यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखले होते, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मोठ्या मनाचाही उल्लेख केला. निवडणुकीच्या राजकारणामुळे देशातील वातावरण बिघडत असून, अशा प्रकारच्या घटना पूर्वी घडत नव्हत्या, असा दावाही मसूद यांनी केला.
 
 
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना मसूद यांनी त्यांच्या विधानाकडे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे म्हटले. मुस्लिम असल्यामुळे शिक्षा भोगावी लागत असल्याची भावना आझम खान यांच्या शब्दांतून व्यक्त झाली असून, देशातील मुस्लिमांची परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आझम खान यांच्याविरोधातील प्रकरणांचा उल्लेख करताना त्यांनी म्हशी, कोंबड्या आणि अंड्यांच्या चोरीसारख्या आरोपांवरून राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचले आहे, असा सवाल उपस्थित केला. अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा हिशेब याच जन्मात आणि याच भूमीवर द्यावा लागेल, असे सांगत त्यांनी ईश्वराच्या न्यायाचा दाखलाही दिला.