नागपूर,
avinash-deuskarहिमालयातील साहसी मोहिमा, गिर्यारोहण आणि साहसाधारित शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नागपूरचे अविनाश देऊस्कर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 31 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 62 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहस, गिर्यारोहण आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रातील एक अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे. ते रामनगर, नागपूर येथे राहत होते. त्याच्या पश्चात पत्नी गियारोहक विमला देऊस्कर, दोन मुले डॉ. कुणाला व तपन देऊस्कर तसेच, बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
देऊस्कर यांनी १९८६ मध्ये काठमांडू ते लेह अशी २,३०० किलोमीटरची हिमालयीन पदयात्रा १४१ दिवसांत पूर्ण केली होती. या पहिल्या नागरी हिमालयीन पदयात्रेचे त्यांनी नेतृत्व केले होते. १९८३ पासून त्यांनी हिमालयात १३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक गिरिभ्रमण केले. तसेच २०० हून अधिक हिमालयीन मोहिमा आणि १,२०० हून अधिक साहसी शिबिरांचे आयोजन केले.
साहस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये ‘ऑरेंज सिटी अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरविण्यात आले होते. साहसाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्वगुण, संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले.
ते अॅडव्हेंचर ट्रेनिंग अकॅडमी प्रा. लि. आणि हिमालयन एक्सकर्शन्स प्रा. लि.चे संचालक होते. तसेच आउटवर्ड बाउंड भारत ट्रस्टचे संस्थापक कार्यकारी संचालक आणि संस्थापक विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आउटवर्ड बाउंड इंटरनॅशनलच्या भारतातील पहिल्या अधिकृत केंद्राची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. मेलघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी युवकांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही ते कार्यरत होते.
त्यांच्या निधनाने साहस, गिर्यारोहण आणि अनुभवाधारित शिक्षण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.