दिवाळीला मातीच्याच पणत्या लावूया !

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
Diwali दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा रंगीबेरंगी कंदील, पणत्या, विजेची तोरणे, रांगोळीचे रंग यांनी सजल्या आहेत. जीवनातील निरुत्साह, निराशा आणि नकारात्मकतेच्या अंधकाराकडून उत्साहाच्या, चैतन्याच्या आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या दीपावली सणाला हजारो वर्षांचा इतिहास आहे.

ykiu 
 
दिवाळीला दीपावली असेही म्हटले जाते. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. दिवाळी खरेतर दिव्यांचा उत्सव. दिवाळीत मातीच्या पणत्यांमध्ये तेलाची वात लावून दारात दोन्ही बाजूंना, दारात काढलेल्या रांगोळीजवळ आणि तुळशीजवळ त्या ठेवल्या जातात. पूर्वी दारासमोर टांगलेल्या आकाशकंदिलातही मातीची पणती लावत. कालानुरूप यामध्ये बदल होत गेला आणि मातीच्या पणतींची जागा हळू हळू विद्युत दिव्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. पणतीसारखे दिसणारे लुकलुकणारे दिवे बाजारात मिळू लागले आहेत. सेल किंवा विद्युत प्रवाहावर चालणारे हे दिवे प्रकाश देत असले तरी पणत्यांमधून प्रक्षेपित होणारी सात्विकता यामध्ये नाही. विजेच्या कृत्रिम दिव्यांमुळे मातीचे दिवे Diwali  बनवणारी आणि ती विकणारी गोरगरीब मंडळी यांच्यावर संक्रांत येऊ लागली आहे. मातीच्या दिव्याची सर या निर्जीव दिव्यांना कशी येणार ? त्यामुळे या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मोहात न पडता दिवाळी सणामागील शास्त्र लक्षात घेऊन मातीच्या पणत्याच खरेदी कराव्यात. जेणेकरून त्या विकणाऱ्या आणि बनवणाऱ्या गरिबांच्या घरातही दिवाळी साजरी होईल.