दुष्काळात सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा व्यावसायिक वापर!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
वर्धा,
public-well-during-a-drought नालवाडी ग्रामपंचायत हद्दीतील लहरीनगर परिसरातील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा कथितपणे व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील अनेक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली असताना सार्वजनिक जलस्त्रोताच्या पाण्याचा खाजगी व्यावसायिक कामांसाठी वापर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
public-well-during-a-drought
 
लहरीनगर परिसरात नागरिकांच्या उपयोगासाठी सार्वजनिक विहीर आहे. मात्र, या विहिरीतील पाणी व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याच्या उद्देशाने पाइपलाइन टाकण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित पाइपलाइन काढून टाकली. सार्वजनिक विहिरीतील पाणी नागरिकांच्या गरजांसाठी असताना त्याचा खाजगी व्यावसायिक वापर कशाच्या आधारे केला जात आहे, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
 
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना पिण्यासह दैनंदिन वापरासाठी पाण्याची उपलब्धता होणे आवश्यक आहे. मात्र, सार्वजनिक जलस्त्रोतांचा व्यावसायिक वापर झाल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणीटंचाईत भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी ३१ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत नालवाडीच्या प्रशासकाकडे तक्रार केली आहे. सार्वजनिक विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा कथित व्यावसायिक वापर थांबवावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेते, याकडे लहरीनगर वासीयांचे लक्ष लागले आहे.