कोलकाता,
cyclone is set to form in the Bay of Bengal बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमान समुद्र परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशासह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे संभाव्य चक्रीवादळ २ नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अरुणाचल प्रदेश, केरळ आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण भारतातील काही भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. रविवारी अरुणाचल प्रदेश, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे आणि तेलंगणामध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह वादळी पाऊस होऊ शकतो. छत्तीसगड, किनारपट्टीवरील कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १ आणि २ नोव्हेंबरदरम्यान केरळ, आंध्र प्रदेश, यानम, किनारपट्टीवरील कर्नाटक, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान किनारपट्टीवरील कर्नाटकात वादळी पाऊस आणि वीज पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २ आणि ३ नोव्हेंबरला छत्तीसगड आणि झारखंडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून, पूर्व मध्य प्रदेशातही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दुसरीकडे, राजधानी दिल्लीत रविवारी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळी उत्तर-पश्चिम दिशेने ताशी १५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तर दुपारच्या सुमारास त्यांचा वेग ताशी २२ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे सावट असताना दिल्लीकरांना मात्र तुलनेने स्वच्छ हवामानाचा अनुभव मिळणार आहे.