नवी दिल्ली,
Death of Honey Singh's nephew प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याचा पुतण्या विदित ओलक याचा पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विदितचा मित्र आरव तलवार याचाही जीव गेला. रविवारी पहाटेच्या सुमारास वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलीस लाइन्स परिसरातील उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या कारने धडक दिली. या घटनेमुळे ओलक आणि तलवार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विदित हा पंजाबी संगीत क्षेत्रातील ‘स्पीड रेकॉर्ड्स’ कंपनीचे मालक दिनेश यांचा मुलगा होता, तर आरव तलवार हा ‘पॅपी स्वीट्स’च्या मालकाचा मुलगा होता.

वृत्तानुसार, पोलीस लाइन्स परिसरातील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. बरादरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहिल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजता पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. त्यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उड्डाणपुलाची साफसफाई करत होते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर उभा केला होता. बीएमसी चौकाकडून बीएएसएफ चौकाच्या दिशेने जात असताना कार या ट्रॅक्टरला धडकली. कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत विदित ओलक आणि आरव तलवार यांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. मात्र, कुटुंबीयांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेनंतर हनी सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. ‘हे माझ्यासाठी दुःखाने भरलेले दशक होते. मी माझ्या पुतण्याला गमावले. या बातमीने मी खचलो आहे. हे खूप धक्कादायक आहे. भोलेनाथ, मेहेर मेहेर...’ अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. पुतण्याच्या निधनामुळे हनी सिंगला मोठा धक्का बसल्याचे त्याच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.