विमानाऐवजी ड्रोन...राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Experiment with artificial rain in the state राज्यात यंदा पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. ऑक्टोबर महिन्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र असून, शेतातील पिके वाळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. राज्य सरकारने ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता कृत्रिम पावसाच्या पर्यायाची चाचपणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्लाउड सीडिंग प्रयोगाची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली.
 
 
cakks
 
या प्रयोगादरम्यान ड्रोनला सुमारे ४०० मीटर उंचीवर नेऊन ढगांमध्ये क्षारांवर आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जालन्यात प्रथमच अशा प्रकारची चाचणी घेण्यात आल्याची माहिती अभ्यासक बळीराम बागल यांनी दिली. पारंपरिक पद्धतीत विमानांच्या माध्यमातून ढगांमध्ये सोडियम क्लोराइडची फवारणी केली जाते. मात्र, विमानाचा वापर करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात, आवश्यक त्या ठिकाणी आणि गरजेनुसार क्लाउड सीडिंग करणे शक्य आहे का, याचा अभ्यास या प्रयोगातून करण्यात येत आहे. तसेच ढगांच्या विशिष्ट उंचीपर्यंत ड्रोन पोहोचवून फवारणी करता येते का, याचीही पडताळणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्यास कृत्रिम पावसासाठी ड्रोनचा वापर हा तुलनेने किफायतशीर आणि सोयीचा पर्याय ठरू शकतो.
 
 
दुसरीकडे, दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जात आहे. जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेता चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही जोर धरत आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आतापासूनच पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जालन्यातील ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाची चाचणी यशस्वी ठरल्यास दुष्काळी भागांसाठी हा प्रयोग महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.