गोंदिया,
gondia-detection-campaignकुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष शोध मोहिमेत जिल्ह्यात १७१ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३ लाख ४० हजार ४१५ घरांना भेटी देत १३ लाख ९१ हजार २११ नागरिकांची तपासणी करण्यात आली. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय कुष्ठरुग्णांची संख्या ४२३ झाली असून, सर्वांवर मोफत औषधोपचार सुरू आहेत.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात १७ दिवस ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाने १ हजार ३१४ विशेष पथके तैनात केली होती. आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या या पथकांनी दुर्गम भागातही घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली. मोहिमेत आढळलेल्या १७१ नवीन रुग्णांमध्ये ११० पी.बी. (पॉसिबॅसिलरी) आणि ६१ एम.बी. (मल्टिबॅसिलरी) रुग्णांचा समावेश आहे. सर्व नवीन रुग्णांवर तातडीने बहुऔषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात २५२ सक्रिय कुष्ठरुग्ण उपचार घेत होते. त्यात या मोहिमेत आढळलेल्या १७१ रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या ४२३ वर पोहोचली आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
त्वचेवर फिकट, पांढरट किंवा लालसर डाग पडणे, डागांच्या ठिकाणी स्पर्शाची जाणीव नसणे, घाम न येणे, हात-पायांच्या बोटांना बधिरपणा येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहर्यावर सूज अथवा गाठी येणे, तसेच हात-पायांच्या नसा जाड होऊन दुखणे, ही कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच नागरिकांनी दुर्लक्ष न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.
कुष्ठरोगाची नोंद बंधनकारक
कुष्ठरोग हा अधिसूचित आजार घोषित करण्यात आला असून, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आढळणार्या रुग्णांची प्रशासनाकडे नोंद करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या आजाराची तपासणी आणि औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोगाबाबत भीती किंवा सामाजिक संकोच न बाळगता नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत. वेळेवर निदान आणि नियमित औषधोपचारामुळे संभाव्य अपंगत्व टाळता येते.
- डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया