नवी दिल्ली,
जगातील लोकप्रिय यूट्यूबर मिस्टर बीस्ट याने नुकताच भारताचा दौरा केला. या भेटीदरम्यान त्याने अभिनेता रणबीर कपूरची भेट घेतली, तसेच आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाललाही भेट दिली. या दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत त्याने एक अनोखे बेसबॉल चॅलेंज आयोजित केले. या स्पर्धेत हार्दिक आणि मिस्टर बीस्ट यांच्यात थेट मुकाबला झाला. बेसबॉल बॅटने चेंडू मारून तीन वेळा स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याचे आव्हान दोघांसमोर ठेवण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत हार्दिकने बाजी मारत एक लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ९५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.

विशेष म्हणजे, मिस्टर बीस्टने आपण लहानपणी बेसबॉल खेळत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या खेळाचा काही अनुभव त्याच्याकडे होता. याउलट हार्दिकने यापूर्वी कधीही बेसबॉल खेळला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पहिल्याच प्रयत्नात त्याने मारलेला फटका पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिकचा पहिला शॉट स्टेडियमच्या बाहेर गेला नसला, तरी चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ पोहोचला. त्याची ही कामगिरी पाहून मिस्टर बीस्टसह उपस्थित यूट्यूबर्सही थक्क झाले. हार्दिकचा हा पहिलाच बेसबॉल फटका असल्यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया मिस्टर बीस्टने दिली. अखेरीस तीन वेळा चेंडू स्टेडियमबाहेर मारण्याचे आव्हान पूर्ण करत हार्दिकने विजय मिळवला.
या विजयापेक्षाही हार्दिकने बक्षिसाच्या रकमेसंदर्भात घेतलेला निर्णय अधिक चर्चेत आला आहे. मिस्टर बीस्टने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकने जिंकलेली एक लाख अमेरिकन डॉलर्सची संपूर्ण रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हार्दिक सध्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने क्रिकेटपासून दूर आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील त्याच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो कायम राहणार की अन्य संघात जाणार, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ट्रेडद्वारे तो मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशी चर्चा यापूर्वी होती; मात्र ताज्या वृत्तांनुसार, तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व कायम ठेवण्याची शक्यता आहे.