मुंबई
Indian Railways रेल्वेने पार्सल सेवा अधिक आधुनिक, जलद आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने ‘डोअर-टू-डोअर’ अर्थात घर ते घर ही नवी डिजिटल सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेमुळे आता पार्सल बुक करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. ग्राहक मोबाईल ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून घरबसल्या पार्सल बुक करू शकतील. या सुविधेचा विशेष फायदा छोटे व्यापारी, कारागीर, शेतकरी आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांना होणार असून, त्यांना माफक दरात पार्सलची सुरक्षित वाहतूक करता येणार आहे.
पहिल्या टप्प्यात आठ शहरांमध्ये सेवा
रेल्वेची ही आधुनिक पार्सल सेवा सुरुवातीला देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील सेवेचा अनुभव आणि प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील टप्प्यांत तिचा देशभर विस्तार करण्यात येणार आहे.
ही संपूर्ण सेवा फर्स्ट माईल, मिडल माईल आणि लास्ट माईल अशा तीन टप्प्यांत कार्यरत असेल. यानुसार, लॉजिस्टिक्स पार्टनर ग्राहकाच्या घरातून किंवा कार्यालयातून पार्सल घेऊन जातील. त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून ते नियोजित शहरात पोहोचवले जाईल. संबंधित शहरात पोहोचल्यानंतर पार्सल थेट प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर सुपूर्द केले जाईल.या नव्या सुविधेसाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपमध्ये अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध असतील. ग्राहकांना मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून पार्सलची माहिती भरता येईल. तसेच यूपीआय, कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून पिकअप, रेल्वे वाहतूक आणि डिलिव्हरी शुल्काचे एकत्रित पेमेंट करता येईल.
या व्यवस्थेत कागदी वे-बिलऐवजी डिजिटल फॉरवर्डिंग नोटचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक पार्सलसाठी १० अंकी स्वतंत्र ट्रॅकिंग क्रमांक दिला जाईल. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलवरून पार्सलचे थेट लोकेशन पाहता येणार आहे. याशिवाय, पार्सल अंतिम पत्त्यावर सुपूर्द करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ओटीपी आधारित पडताळणी केली जाणार आहे.
या सेवेंतर्गत रेल्वे गाडी सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या १५ दिवस आधीपासून ते किमान एक दिवस आधीपर्यंत पार्सलचे बुकिंग करता येणार आहे. पिकअप होण्यापूर्वी बुकिंग रद्द केल्यास नियमानुसार ग्राहकांना पैसे परत मिळतील.दरम्यान, पार्सलमधील वस्तूंचे योग्य आणि सुरक्षित पॅकिंग करणे ग्राहकांसाठी आवश्यक असणार आहे. ज्वलनशील, स्फोटक किंवा अन्य प्रतिबंधित वस्तूंचे बुकिंग करू नये, असे स्पष्ट निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. या नव्या सुविधेमुळे पार्सल पाठवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.