नवी दिल्ली,
India’s golden victory on the kabaddi court राष्ट्रकुल कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच आवृत्तीत भारतीय संघांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत भारताने सुवर्णपदकांची कमाई करत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुष संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ५४-२० असा मोठ्या फरकाने पराभव केला, तर महिला संघाने युगांडाला ३५-१५ असे नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता भारतासाठी दुहेरी सुवर्णयश संपादन केले.

सुरजीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुरुष संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या सत्रात भारताने १५-२ अशी आघाडी मिळवली होती. पहिल्या २० मिनिटांतच भारतीय संघाने २० गुणांची आघाडी घेत श्रीलंकेच्या बचावफळीला निष्प्रभ केले. भारताकडून आदित्य शिंदेने ६ टच पॉइंट्ससह सर्वाधिक १० गुण मिळवले. भरत हुडा आणि पंकज मोहिते यांनी अनुक्रमे ८ आणि ६ गुणांची भर घातली. बचावफळीत योगेश दहियाने ५ टॅकल गुण मिळवत महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूंनी तिरंगा घेऊन सन्मान फेरीही काढली. पुरुष गटात श्रीलंकेला रौप्यपदक मिळाले, तर केनिया आणि बांगलादेशने कांस्यपदक पटकावले.
महिला संघानेही पुरुषांच्या यशाची पुनरावृत्ती करत अंतिम सामन्यात युगांडावर ३५-१५ असा विजय मिळवला. भारताकडून साक्षीने १० प्रयत्नांत ९ गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली. अनु सेनने ६ रेड गुण मिळवले, तर निधी शर्माने बोनस गुणांची भर घालत प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. भारतीय महिलांनी सामन्यात २० रेड आणि १० टॅकल गुणांची नोंद केली. महिला गटात युगांडाला रौप्यपदक मिळाले, तर केनिया आणि श्रीलंकेने कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे पुरुष आणि महिला दोन्ही गटांत सुवर्णपदक मिळवत भारताने राष्ट्रकुल कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात आपली छाप उमटवली.