तेहरान,
Iran's proposal to the US इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नसताना तेहरानने चर्चेसाठी सात अटी पुढे केल्या आहेत. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रझाई यांनी या अटी अमेरिकेने मान्य केल्यास दोन्ही देशांमधील संवाद आणि राजनैतिक चर्चेचा मार्ग खुला होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. मात्र, इराणवर पुन्हा हल्ला झाल्यास त्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या निर्देशानुसार इराण नव्या शस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असल्याचे रझाई यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या ‘ॲक्सिऑस’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी इराणची राजधानी तेहरान येथे कतारच्या मध्यस्थांनी १२ तासांहून अधिक काळ चर्चा केली.

अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यासाठी इराणने सात अटी मांडल्या आहेत. त्यामध्ये इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंध हटवणे आणि परदेशात अडकलेली आर्थिक संपत्ती परत मिळवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. कतारमध्ये इराणचे ६ अब्ज डॉलर्स ठेवण्यात आले असून, ही रक्कम परत मिळावी, अशीही तेहरानची अपेक्षा आहे. याशिवाय अमेरिकेने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध उठवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये जून २०२६ मध्ये झालेल्या करारानुसार अमेरिकेने तेल निर्यातीबाबत सवलती देण्याचे आणि नव्याने निर्बंध न लादण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा इराणकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतही अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्यापूर्वी इराणने अणुकार्यक्रमासंदर्भात काही सवलती द्याव्यात, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चेत आर्थिक निर्बंध, तेल निर्यात आणि अणुकार्यक्रम हे मुद्दे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. इराणने चर्चेसाठी अटी मांडल्या असल्या तरी हल्ला झाल्यास माघार न घेता बळाचा वापर करून प्रत्युत्तर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे राजनैतिक चर्चेचा मार्ग खुला होणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.