SBI बँकेवर सशस्त्र दरोडा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकच निघाला मास्टरमाइंड

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
जळगाव
jalgaon sbi bank robbery जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेवर बंदुकीचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बँकेत घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत व्यवस्थापक आणि कॅशियर यांना मारहाण करून दरोडेखोरांनी तिजोरीतील सोने आणि रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेले तब्बल २७ किलो सोने, १५ लाख रुपयांची रोकड, दोन बंदुका आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार एक बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याचे तपासात समोर आले आहे.
 

jalgaon sbi bank robbery  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासर, अंकुश चव्हाण आणि अंकुश तुळशीराम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघांची नावे आहेत. या तिघांसह एकूण चार जणांनी मिळून भोकर येथील एसबीआय शाखेवर दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शंकर जासर याने संपूर्ण दरोड्याचे नियोजन केले होते. त्यामुळे तो या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
आरोपींनी बँकेत प्रवेश केल्यानंतर कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. यावेळी बँक व्यवस्थापक आणि कॅशियर यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिजोरीतील सोने आणि रोख रक्कम घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बँकेतील सुरक्षारक्षकावर एका आरोपीने बंदुकीतून गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दरोड्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरोड्यानंतर आरोपी पळून जात असताना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. या कारवाईत चारही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून दोन बंदुका आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच बँकेतून लुटलेले २७ किलो सोने आणि १५ लाख रुपयांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर जासर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी दरोडा आणि लाचखोरीसारख्या प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या एका गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर रायगड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीनेच सशस्त्र दरोड्याचा कट रचल्याचे समोर आल्याने या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या दरोड्याचे नियोजन नेमके कशा प्रकारे करण्यात आले होते, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. बँकेवर दरोडा टाकण्याच्या या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.