हाँगकाँग,
Krunal Pandya shines with the ball हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत सलग तीन पराभवांचा सामना केल्यानंतर अखेर भारतीय संघाने विजयाचे खाते उघडले आहे. १ नोव्हेंबर रोजी मिशन रोड मैदानावर झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर शेवटच्या चेंडूवर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात क्रुणाल पांड्या आणि शशांक सिंह यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. क्रुणालने गोलंदाजीत तीन बळी मिळवले, तर शशांकने अवघ्या १५ चेंडूंत ५० धावांची आक्रमक खेळी केली. या कामगिरीमुळे स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांतील पराभव विसरून भारतीय संघाला अखेर विजयाची चव चाखता आली.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशने सहा षटकांत पाच गडी गमावून ११६ धावांचा डोंगर उभा केला. बांगलादेशचा कर्णधार अबू हिदर रोनी याने अवघ्या १८ चेंडूंत आठ षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा कुटल्या. हबीबुर रहमान सोहनने सहा चेंडूंत १८, सब्बीर रहमानने चार चेंडूंत १३, तर चौधरी मोहम्मद रिझवानने पाच चेंडूंत १२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार क्रुणाल पांड्याने दोन षटकांत २५ धावा देत तीन बळी मिळवले, तर राहुल त्रिपाठीने एक गडी बाद केला. विजयासाठी ११७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला शशांक सिंहने आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने सात षटकार आणि एका चौकारासह १५ चेंडूंत ५० धावा ठोकल्या. त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदानाबाहेर गेला. राहुल त्रिपाठीने १२ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. नितीश राणाने चार चेंडूंत नाबाद १०, तर राहुल तेवतियाने पाच चेंडूंत नाबाद १६ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी क्रुणाल पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या विजयापूर्वी गट 'क' मध्ये असलेल्या भारतीय संघाला सलग तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला चार गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने सहा गडी राखून, तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने तीन गडी राखून भारतावर मात केली होती. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा हा विजय भारतीय संघासाठी स्पर्धेतील पुनरागमनाची महत्त्वाची सुरुवात मानला जात आहे.