अनिल कांबळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, पोलीस आयुक्तांनाही माहिती; धमकी मिळाल्यास तातडीने कळवण्याचे आवाहन
नागपूर
Lawrence Bishnoi Gang नागपूरच्या सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने धमकीची पत्रे मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही व्यापाऱ्यांना फोन आणि अन्य माध्यमांतूनही धमकावण्याचे प्रयत्न होत असल्याचे नागपूर सराफा असोसिएशनने सांगितले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत असोसिएशनने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशीही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आणि असोसिएशन समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहेत.
दरम्यान, धमकीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन असोसिएशनकडून करण्यात आले आहे. कोणत्याही व्यापाऱ्याला धमकीचा फोन, पत्र किंवा अन्य माध्यमातून संदेश प्राप्त झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने असोसिएशनला माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
धमकीसंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणाबाबत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी बातचीत करण्यात आली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या धमक्यांची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.धमकीच्या पत्रांमागे नेमके कोण आहे, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून होणे महत्त्वाचे ठरणार आहे.