नागपूर,
massive-fire नागपुरातील लकडगंज लघुउद्योग परिसरात प्लास्टिक बारदान्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कच्चा माल आणि तयार साहित्य असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाचे सहा ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामाच्या आत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लकडगंज लघुउद्योग परिसरात प्लास्टिकशी संबंधित अनेक लघुउद्योग आणि कंपन्या आहेत. त्यामुळे गोदामाला लागलेली आग आजूबाजूच्या उद्योगांपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान आगीला इतर कंपन्यांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.
गोदामाच्या आत आगीचे मोठे लोळ असल्याने बाहेरून पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गोदामातील काही तयार साहित्य आणि निर्मित माल बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मात्र, आगीची तीव्रता पाहता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझविण्यासाठी प्रयत्नशील असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या घटनेमुळे लकडगंज लघुउद्योग परिसरात एकच खळबळ उडाली आहे.