मुंबई
Mumbai Local Train मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे नकळत व्हिडिओ चित्रित करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करून महिलांची बदनामी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दक्षिण सायबर पथकाने ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद साबिर मोहम्मद रुस्तम असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी वसई पूर्व येथे वास्तव्यास असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहे. त्याने तयार केलेल्या एका रीलला तब्बल १ लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.
चर्चगेट-विरार लोकलमध्ये तरुणींचे चित्रीकरण
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री चर्चगेट ते विरार फास्ट लोकलमधून एक महाविद्यालयीन तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत प्रवास करत होती. यावेळी आरोपीने दोघींचेही नकळत व्हिडिओ चित्रित केले. त्यानंतर २७ जून २०२६ रोजी संबंधित तरुणीचा व्हिडिओ अश्लील गाण्याच्या पार्श्वभूमीवर रीलच्या स्वरूपात इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आला.
या व्हिडिओमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह स्वरूप तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या रीलला १ लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने संबंधित तरुणीची सोशल मीडियावर बदनामी झाली.
‘लेडी बॉस’ नावाने बनावट खाते
या प्रकरणाचा तपास करताना आरोपीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीने इन्स्टाग्रामवर ‘लेडी बॉस’ या नावाने बनावट खाते तयार केले होते. या खात्यावर त्याने स्वतःचे नाव, छायाचित्र किंवा ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती ठेवली नव्हती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बहुस्तरीय तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर मोहम्मद साबिर मोहम्मद रुस्तम याला अटक करण्यात आली.
महिलांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान कोणी महिलांचे गुपचूप फोटो किंवा व्हिडिओ काढत असल्याचे आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, मॉर्फ केलेले किंवा AI च्या माध्यमातून तयार केलेले फोटो अथवा व्हिडिओ आढळल्यास ते पुढे पाठवू नयेत किंवा शेअर करू नयेत. अशा प्रकारांबाबत १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.