मुंबई
nita ambani रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते रविवारी महाराष्ट्रातील कर्जत येथे ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे १०० एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ५ हजारांहून अधिक अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरासारखे जिव्हाळ्याचे वातावरण, प्रेम आणि आवश्यक देखभाल उपलब्ध करून दिली जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला ईशा अंबानी यांचीही उपस्थिती होती. रिलायन्स फाउंडेशनचा हा ना-नफा तत्त्वावरील उपक्रम आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, ‘अनंत आश्रय’ हा प्रकल्प त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. त्या म्हणाल्या, “एक आई म्हणून माझी सर्वांत मोठी इच्छा आहे की, ज्या पालकांना आपल्या पश्चात मुलांची काळजी कोण घेईल, याची आयुष्यभर चिंता सतावत असते, त्यांना आपल्या मुलांचे हक्काचे घर आणि कुटुंब कायम असेल, हा विश्वास मिळावा.” या प्रकल्पात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सन्मानाने जगता यावे आणि प्रत्येक नव्या दिवसाकडे आशेने पाहता यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘अनंत आश्रय’ ही संकल्पना केवळ निवारा देणाऱ्या केंद्रापुरती मर्यादित नसून, प्रत्येक व्यक्तीला सन्मान, आपलेपणा आणि सुरक्षिततेची भावना देणारा समुदाय विकसित करण्याची आहे. या परिसरात लहान, कुटुंबवत्सल घरांची उभारणी केली जाणार असून, तेथे विशेष प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी रहिवाशांची काळजी घेतील. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आरोग्यसेवा, शिक्षण आणि वैयक्तिक विकासाचे नियोजन केले जाईल. रहिवासी, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांचा समावेश असलेला सुमारे १५ हजार लोकांचा समुदाय येथे विकसित होण्याची अपेक्षा आहे.
या प्रस्तावित परिसरात विशेष रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, फिजिओथेरपी आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय शिक्षण, क्रीडा, संगीत आणि कला यांसारख्या क्षेत्रांत सहभागी होण्याच्या संधीही मिळतील. बेकरी, कॅफे आणि हस्तकला केंद्रांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाला चालना दिली जाईल. परिसरात मंदिर, उद्याने तसेच वनताराच्या सहकार्याने प्राण्यांशी जवळीक साधण्याची संधी देणारे फार्म उभारण्याचेही नियोजन आहे. या प्रकल्पातील काही सुविधांचा लाभ आसपासच्या गावांतील नागरिकांनाही घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, नीता अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या उपक्रमाची पायाभरणी केली. आपल्या मनोगतात त्यांनी हा उपक्रम ‘भारतमातेच्या चरणी एका आईकडून अर्पण करण्यात आलेली छोटीशी भेट’ असल्याची भावना व्यक्त केली.