पाबे घाटात कार १५० फूट खोल दरीत कोसळली

पर्यटकांचे थरारक बचावकार्य, तिघांचे प्राण वाचले

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
पुणे
Pabe Ghat Accident पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील पाबे घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेली कार घाट चढताना अचानक बंद पडली. त्यातच पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने कार घसरत थेट सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले असले, तरी सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मागून येणाऱ्या पर्यटकांनी तत्परता दाखवत मदत केल्यामुळे तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
 
 

Pabe Ghat Accident Car Falls 150 Feet into Gorge Near Pune, Tourists Rescued Safely
मिळालेल्या माहितीनुसार, मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश हे तिघे जण तोरणा किल्ला पाहण्यासाठी आज पहाटे हडपसर येथून कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास त्यांची कार पाबे घाट चढत असताना अचानक बंद पडली. कार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाऊस आणि ओलसर रस्त्यामुळे कार घसरू लागली. काही क्षणांतच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली.
 
 

मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवली तत्परता
अपघात घडताच मागून Pabe Ghat Accident  येणाऱ्या काही पर्यटकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी स्वतःकडील दोरीच्या मदतीने कारमधील तिघांना बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले. संकटाच्या प्रसंगी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
यानंतर तानाजी भोसले, त्याने सपकाळ, संदीप सोळसकर आणि दिलीप तळेकर यांच्या बचाव पथकानेही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अपघातातील तिघांना पुढील उपचारांसाठी वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे शहरात पाठवण्यात आले.
पावसाळी वातावरणात घाटरस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे. तसेच अपघाताच्या वेळी मदतीसाठी धावून आलेल्या पर्यटकांच्या तत्परतेचेही कौतुक होत आहे.