२४ वर्षांचा विक्रम कायम, पण पाकिस्तानची बरोबरी!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan's record-breaking victory पाकिस्तान क्रिकेट संघाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकेने दिलेले ३२६ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठत पाकिस्तानने एकदिवसीय क्रिकेटच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याच्या भारताच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. गेल्या २४ वर्षांपासून हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. २००२ मध्ये नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध ३२६ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला होता. आता पाकिस्ताननेही श्रीलंकेविरुद्ध तितक्याच धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. पाकिस्तानच्या विजयाचा मुख्य शिल्पकार सलामीवीर फखर जमान ठरला. त्याने ९९ चेंडूंत १२७ धावांची शतकी खेळी केली. त्याला साद बेगने ७४ धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. मात्र, अराफात मिन्हासने अवघ्या ३१ चेंडूंत ६१ धावा ठोकत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
 
ffgh769890
 
 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ३२५ धावांची मजल मारली. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांनी पहिल्या गड्यासाठी ८७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मेंडिस आणि पवन रत्नायके यांनी १४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या मोठ्या टप्प्याकडे नेली. एका टप्प्यावर श्रीलंकेचा संघ ३४० ते ३५० धावांपर्यंत पोहोचेल असे चित्र होते. मात्र, अखेरच्या १० षटकांमध्ये नियमित अंतराने गडी बाद झाल्याने श्रीलंकेला ३२५ धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली आणि सुरुवातीलाच दोन गडी बाद झाले. बाबर आझमही शून्यावर माघारी परतला. मात्र, फखर जमान आणि साद बेग यांनी १४९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. त्यानंतर पुन्हा गडी बाद होऊ लागल्याने पाकिस्तानसमोर आव्हान निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत अराफात मिन्हास आणि हसन नवाज यांनी ९४ धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. हसन नवाज ३७ धावांवर नाबाद राहिला आणि पाकिस्तानने तीन गडी राखून अंतिम सामना जिंकला.
 
 
एकदिवसीय क्रिकेटच्या अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या विक्रमात आता भारत आणि पाकिस्तान संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी ३२६ धावांचे लक्ष्य गाठले आहे. या यादीत भारताने पाकिस्तानविरुद्ध ३१५ धावांचा पाठलाग केला होता. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २९८, तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध २८७ धावांचे लक्ष्य गाठले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदी याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरीही प्रभावी ठरत आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाने आतापर्यंत १६ सामने खेळले असून त्यापैकी ११ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाच सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या विजयामुळे पाकिस्तानने केवळ तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळवले नाही, तर भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक विक्रमाशीही बरोबरी साधली आहे.