एकाच दिवशी ३१ शस्त्रक्रिया
गोंदिया,
amgaon-taluka कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांवर न ठेवता पुरुषांनीही पुढाकार घेण्याची सकारात्मक भूमिका आमगाव तालुक्यातून पुढे आली आहे. आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ठाणा येथे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात एकाच दिवशी ३१ पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी स्वतः या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजेश बेळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते रिबन कापून व ऑपरेशन थिएटरचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. पटले यांनी नॉन स्कॅल्पेल व्हॅसेक्टॉमी (एनएसव्ही) या आधुनिक पुरुष नसबंदी पद्धतीची माहिती दिली. ही शस्त्रक्रिया साधारणतः १० ते १५ मिनिटांत पूर्ण होते. यामध्ये मोठी चिरफाड अथवा टाके घालण्याची आवश्यकता नसते. ही सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया असून, शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच लाभार्थी घरी जाऊ शकतात. पुरुषांच्या शारीरिक क्षमतेवर किंवा वैवाहिक जीवनावर याचा विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनात पुरुषांनीही जबाबदारी स्वीकारून पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य कर्मचार्यांनी केलेल्या जनजागृती व समुपदेशनामुळे शिबिराला प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, बनगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूमेश्वर पटले, ननसरीचे डॉ. राहुल सेवईकर, तिगावचे डॉ. तुलसी भगत आणि ठाणाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बरई उपस्थित होते.
शस्त्रक्रियेत ठाणा केंद्र अग्रेसर...
शिबिरात ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक १२ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली. तर तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ११ व बनगाव आणि कालीमाटी केंद्रातील प्रत्येकी चार पुरुषांनी सहभाग नोंदविला.