चंद्रपूर,
water-supply-schemes बंद पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय 30 ऑक्टोबर 2026 रोजी काढण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील 13 प्रादेशिक योजनांना याचा फायदा होईल. या योजना सुमारे 4.92 कोटींच्या थकीत वीजबिलामुळे बंद आहेत. या योजनांवर 190 गावांतील सुमारे 1.75 लाख नागरिक अवलंबून आहेत. सुरक्षा ठेव आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होणार आहेत.

दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये आणि थकीत वीजबिलांमुळे बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केलेल्या मागणीला महत्त्वपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. यासोबतच 25 सप्टेंबर रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासोबत बैठक घेऊन बंद पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेतला होता. या मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या ऊर्जा विभागाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून थकबाकीमुळे खंडित झालेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या 13 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह राज्यातील पाणीपुरवठा योजनांना पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व शिखर समितीमार्फत एकूण 33 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात. त्यापैकी 20 योजनांद्वारे सध्या पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित 13 योजना सुमारे 4 कोटी 92 लाख 68 हजार रुपयांची वीजदेयके थकीत असल्यामुळे बंद आहेत. या योजनांवर जिल्ह्यातील सुमारे 190 गावांमधील 1 लाख 75 हजार नागरिक अवलंबून आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचे स्रोत आटत असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने या गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला होता.