मुंबई
Prajakta Mali मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नव्या प्रोजेक्ट्सची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. या चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त प्राजक्ता सध्या राजस्थानमधील विविध ठिकाणांना भेट देत असून, तेथील सुंदर ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावरून अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे, एका नेटकऱ्याने तिची थेट अभिनेता गौरव मोरेशी तुलना केली आहे.
गेल्या काही दिवसांत प्राजक्ताच्या लूकमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिने केस छोटे केले असून, तिचे वजनही कमी झाल्याचे दिसत आहे. या नव्या लूकमधील छायाचित्रे आणि व्हिडीओ ती सातत्याने चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकताच प्राजक्ताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जैसलमेरच्या प्रसिद्ध दुर्गाला भेट दिल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने पिवळसर रंगाचा ओव्हरसाइज टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच तिच्या हातात एक स्कार्फही दिसत आहे.
या व्हिडीओसोबत प्राजक्ताने खास कॅप्शन लिहिले आहे. जैसलमेरमधील त्या आठवणी अजूनही मनातून जात नसल्याचे सांगत तिने ‘मुझको भावे तेरी गलियां…’ असे म्हटले आहे. तसेच, ‘मला तेव्हाही जाणवत होते आणि आजही जाणवत आहे, ती एक प्रकारची मुक्तता आणि शांतता!’ अशा शब्दांत तिने या ठिकाणी अनुभवलेल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसोबत तिने ‘#जैसलमेरदुर्ग’ हा हॅशटॅग वापरला आहे.
प्राजक्ताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या सौंदर्याचे आणि लूकचे कौतुक केले आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स करत तिची खिल्ली उडवली आहे. एका चाहत्याने ‘आमच्या महाराष्ट्राची स्टार राजस्थानमध्ये जमकत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने राजस्थान सहलीचा आनंद घेत असलेल्या प्राजक्ताचे कौतुक करत, ‘राजस्थान सहलीचा मनमुराद आनंद लुटताना प्राजक्ता माळी एकदम भारी दिसत आहे. आपल्या आनंददायी सहलीला खूप खूप शुभेच्छा’, असे लिहिले आहे.
मात्र, एका युजरच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये प्राजक्ता पाठमोरी दिसत असताना त्या युजरला ती अभिनेता गौरव मोरेसारखी वाटली. त्याने ‘सॉरी, पण पाठमोरी मला खरंच गौरव मोरे वाटली’, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या नव्या लूकसोबतच या मजेशीर तुलनेचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या अभिनेत्रीचा जैसलमेरमधील हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.