वर्धा,
multi-modal-logistics-park राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारा उभारण्यात येत असलेल्या मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यातीला चालना मिळेल. सोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिंदी रेल्वे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड -एनएचएलएमएल या स्पेशल पर्पज व्हेईकल द्वारा अमारा ट्रान्झ सोल्यूशन या कंपनी मार्फत प्रकल्पाचे आज रविवार १ रोजी आयोजित भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी., माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष राणी कलोडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, आदी उपस्थित होते.
विदर्भातील कापूस, रुई, सुत, संत्रा, भाजीपाला यासारख्या मालाला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यातीला चालना मिळणार आहे. विदर्भातील मुंबई- कोलंबो-ढाका मार्गे जाणार्या वाहतुकीच्या वेळेत बचत होईल. या प्रकल्पातून पहिली मारोती कारची रॅक सुरू झाली आहे, असे गडकरी म्हणाले.
सिंदी रेल्वे स्टेशनजवळ १५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणसह संयुक्तपणे विकसित करत आहे. सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कापसाची रुई, कपडा, संत्रा मुंबईला न जाता कलकत्त्याच्या हल्दीया मार्गे थेट बांग्लादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयावर येईल. याचा विदर्भातील शेतकर्यांना फायदा होणार आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या तरतुदीने नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बांधल्या जाणार्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला सिंदी रेल्वेच्या ड्रायपोर्टला जोडून येथे कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस या सुविधा निर्माण करून वर्धा आणि नागपूर शहरातील मोठमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जे निर्यातक आहेत त्यांचे क्लस्टर येथे तयार करण्यात येईल. सिंदी येथे कस्टमचे देखील कार्यालय राहणार असल्यामुळे देश-विदेशातील कंटेनर या ठिकाणी येणार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला सिंदी रेल्वे येथील नागिरकांना निमंत्रित न करण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
काळी यादी आणि नाराजी
ना. नितीन गडकरी यांनी आजच्या भूमिपूजन कार्यक्रमात मागच्या ठेकेदाराने चांगले काम केले नसल्याने त्याला बदलण्यात आले असल्याचे सांगितले तर महामार्गाचे बांधकाम दर्जेदार नसल्याने त्यांनी महामार्गाविषयीही नाराजी व्यक्त केली.