सँटनरचा ऐतिहासिक विक्रम; न्यूझीलंडचा अव्वल खेळाडू ठरला!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
हॅमिल्टन,
santners-historic-record न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने भारताविरुद्धच्या पाचव्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला आहे. या सामन्यासह सँटनरने १४३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले असून, त्याने अनुभवी फिरकीपटू इश सोधीला मागे टाकले आहे.
 
santners-historic-record
 
न्यूझीलंडकडून सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सँटनर आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. इश सोधीने आतापर्यंत १४२ सामने खेळले आहेत. टीम साउथी १२६ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मार्टिन गुप्टिलने १२२, तर डॅरिल मिचेलने १०९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
 
सँटनरने याआधीही भारताविरुद्धच्या मालिकेत आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. मालिकेतील चौथ्या टी२० सामन्यात त्याने इश सोधीचा आणखी एक विक्रम मोडला. भारताविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा न्यूझीलंडचा गोलंदाज होण्याचा विक्रम त्याने केला. सोधीच्या नावावर भारताविरुद्ध ३० बळी होते, तर सँटनरने आतापर्यंत ३२ बळी मिळवले आहेत. या यादीत इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन २४ बळींसह पुढे आहे. जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २२ बळी घेतले आहेत. चौथ्या सामन्यात सँटनरने चार षटकांत २४ धावा देत दोन फलंदाजांना माघारी धाडले होते.
 
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले. न्यूझीलंडने ब्लेअर टिकनरला संघात स्थान देत एक बदल केला. दुसरीकडे, भारतीय संघाने दोन बदल केले असून, भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली. मयंक यादव आणि अक्षर पटेल यांना या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. एक सामना बाहेर राहिल्यानंतर भुवनेश्वर कुमारचेही संघात पुनरागमन झाले आहे.