‘मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय जातं?

पार्वतीच्या भूमिकेमुळे ट्रोल झालेल्या सोनारिका भदोरियाने अखेर मौन सोडलं!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
मुंबई
Sonarika Bhadoria छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरांत विशेष ओळख निर्माण केली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. परिस्थिती अशी होती की, अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा ‘पार्वती’ याच नावाने अधिक ओळखू लागले होते. मात्र, पडद्यावर देवी पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिकाला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने या ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
 

Sonarika Bhadoria Breaks Silence on Bikini Trolling: ‘I Will Wear a Bikini, Who Has a Problem?’ 
‘महादेव’ मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सोनारिकाने एकदा सोशल मीडियावर बिकिनीमधील काही छायाचित्रे शेअर केली होती. तिचे हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त करत अभिनेत्रीला लक्ष्य केले. काही नेटकऱ्यांनी तिला ‘असंस्कारी’ आणि ‘बेशर्म’ असे संबोधले, तर अनेकांनी अश्लील स्वरूपाच्या कमेंट करत तिच्यावर टीका केली. पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने असे कपडे कसे परिधान केले, असा सवालही काहींनी उपस्थित केला होता.
 
 
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या सोनारिकाने या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. बिकिनी परिधान करण्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना ती म्हणाली, “मी बिकिनी घालेन, त्यात कोणाच्या बापाचं काय जातं? माझ्या वडिलांना किंवा नवऱ्याला यामुळे काहीही फरक पडत नाही. बिकिनी घालण्यात मला कोणतीही अडचण नाही.” महत्त्वाचे म्हणजे, ‘महादेव’ मालिकेनंतर आपण इतर अनेक मालिकांमध्ये काम केले होते, त्यानंतर आपल्याला या फोटोंवरून ट्रोल करण्यात आल्याचेही तिने स्पष्ट केले.
 
 
या अनुभवाबद्दल बोलताना सोनारिका म्हणाली की, लोक सतत ट्रोल करताना ‘पार्वती बिकिनी कशी घालू शकते?’ असा प्रश्न उपस्थित करायचे. मात्र, आपण केवळ एका मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. पडद्यावरील व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्ती यांमध्ये फरक असतो, हे लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे. आपण कोणते कपडे परिधान करतो, त्यातून स्वतःला कशा पद्धतीने सादर करायचे, हा पूर्णपणे आपला वैयक्तिक निर्णय असल्याचेही तिने सांगितले. पाण्यात पोहण्यासाठी जायचे असेल, तर बिकिनी परिधान करणे स्वाभाविक आहे. अशा वेळी कोणी ड्रेस किंवा सूट घालून जाणार नाही, असे उदाहरणही तिने दिले.पुढे ट्रोलर्सवर निशाणा साधताना सोनारिकाने म्हटले की, दुसऱ्यांच्या आयुष्यावर जळणारी माणसेच अशा प्रकारे टीका करत असतात. आपण जे करू शकत नाही, ते दुसरी व्यक्ती कसे करू शकते, अशी भावना त्यांच्या मनात असते. पार्वतीसारखी महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ आहोत. मात्र, एखाद्या मालिकेत विशिष्ट भूमिका साकारली म्हणून अभिनेत्रीचे संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तिरेखेशी जोडणे चुकीचे आहे. लोकांनी आपले स्वतंत्र खासगी आयुष्यही समजून घेतले पाहिजे, असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले.दरम्यान, सोनारिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, ती सध्या पती आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही सक्रिय असून, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सातत्याने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पडद्यावर पार्वतीची भूमिका साकारल्यामुळे निर्माण झालेली लोकप्रियता आणि त्यानंतर वैयक्तिक आयुष्यावरून झालेली टीका, या दोन्ही अनुभवांबद्दल सोनारिकाने आता स्पष्टपणे आपली बाजू मांडली आहे.