नागपूर,
vidarbha-rain-alert-nov-राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही भागांत उन्हाचा चटका कायम असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे ढग जमा होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विदर्भाच्या सहा जिल्ह्यांना १ नोव्हेंबर रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील काही भागांमध्येही तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.