मंगरूळनाथ येथे विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
vijayadashami-festival राष्ट्रसेविका समिती, शाखा मंगरूळनाथ, जिल्हा वाशीम यांच्या वतीने विजयादशमी उत्सवाचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी श्री भालेराव सदन, जय भवानी चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला मंगरूळनाथ नगर परिषदेच्या नगरसेविका सपना बजाज अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या प्राचार्या योगिनी काळू उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख वक्त्या योगिनी काळू यांनी समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला.
 

vijayadashami-festival 
 
१९३६ मध्ये विजयादशमीच्या दिवशी या समितीची स्थापना झाली असून, आज समितीने ९० वर्षांचा गौरवशाली टप्पा पूर्ण केला आहे. या प्रदीर्घ प्रवासात समितीने महिला सक्षमीकरण, संस्कार, शारीरिक शिक्षण आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
 
 
समितीच्या ९० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त सेविकांनी विविध शारीरिक व योगविषयक प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये घोष प्रात्यक्षिकांसह योगासन, टिपरी, डंबेल आणि व्यायामयोगाची प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. सेविकांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनघा बडगे यांनी केले. वैयक्तिक गीत संपदा घोडचोर यांनी सादर केले, तर कृष्णाई देशपांडे हिने प्रार्थना म्हटली. आभार प्रदर्शन नगर कार्यवाहिका रेवती भालेराव यांनी केले. कार्यक्रमाची सांगता रेणुका दांडे यांनी वंदे मातरम् सादर करून केली.या कार्यक्रमाला संघबंधू तसेच परिसरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.