जागेला विरोध केल्याने अविश्वास ठरावाचा कट!

उप सभापती वानखेडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
आर्वी,
wardha-news शेतकऱ्यांच्या कष्टाची जागा बाह्य व्यक्तीच्या घशात घालण्याचा डावाला आपण विरोध केल्यामुळे आपल्यावर अविश्वासाचा डाव रचल्या गेला. परंतु, सुज्ञ संचालकांनी तो डाव हाणून पाडला, अशी माहिती आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत वानखेडे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, आदी उपस्थित होते.
 
 
 
कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे मुख्य मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापासून माती परीक्षण कक्षापर्यतच्या इमारतीला राज्य शासन आणि नगरपरिषदेची परवानगी न घेता दुरुस्तीच्या नावाखाली जुनी इमारत जमीनदोस्त करून नवीन बांधकाम केले. समितीमध्ये लिलाव शेडची कमतरता आहे. माल ओला होतो. निधी उपलब्ध असताना लीलावशेड उभारण्याऐवजी त्रयस्त व्यक्तीला देऊन अनधिकृत कॉम्प्लेक्स उभारले व त्याला आपला विरोध होता. सम्राट हॉटेल परिसरातील जागेचा शासनाची परवानगी न घेता परस्पर लिलाव केला. त्याठिकाणी अडते व व्यापाऱ्यांकरिता दुकानं उभारून प्रत्यक्षात काम करीत असलेल्या अडते व व्यापाऱ्यांना ते दुकानं देणे आवश्यक होते. परंतु वास्तविक सर्व कामांकरिता बाजार समितीकडे निधी उपलब्ध आहे. आपल्याला तो प्रकार न पटल्यामुळे आपण त्यांचा विरोध केला. लिलाव शेड जवळील जागा खाजगी कंपनीला अनधिकृतरीत्या लिजवर दिली. वास्तविक जागा लिजवर देताना त्याला पणन संचालकाची परवानगी व लिजचे रजीस्टर्ड ॲग्रीमेंट पाहिजे. वास्तविक त्या ठिकाणी बाजार समितीचे हमाल भवन होऊ शकले असते. कृषी उत्पन्न बाजार समितीवर करण्यात आलेल्या आरोपाच्या बाबतीत क्लिन चिट मिळाली असे सांगितले जाते. मात्र लेखापरीक्षण अहवालामध्ये गंभीर दोष असून व चौकशी अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट होते. यासंबंधीचा लेखा परीक्षण अहवाल व चौकशी अहवाल दाखवू शकतो, असा दावा वानखेडे यांनी केला.
 
आता वर्धा रोडवरील ७ एकर जागा ही मुख्य मार्केटयार्ड घोषित करून जे.व्हि. तत्त्वावर द्यायच्या गोंडस नावा खाली शेतकऱ्याच्या कष्टाची जागा बाह्य व्यक्तीच्या घशात घालण्याचा डाव असल्यामुळे आणि मी विरोध करणार असल्यामुळे माझ्यावर अविश्वासाचा डाव रचल्या गेला होता, असे ते म्हणाले. यावेळी भाजपा आर्वी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, कारंजा तालुका अध्यक्ष चक्रधर डोंगरे, आष्टी तालुका अध्यक्ष अंकिता होले, शहराध्यक्ष राहुल गोडबोले, भाजपा ज्येष्ठ नेते अनिल जोशी, नपचे गटनेते संजय थोरात, पाणीपुरवठा सभापती अजय कटमवार आदी उपस्थित होते.