अडीच किमीचा टप्पा अपूर्ण
नाल्यावरील पुलाची प्रतीक्षा कायम
मानोरा,
work-on-the-approved-road खापरदरी- सावरगाव कान्होबा रस्त्याचे रखडलेले कामास अद्यापही सुरुवात झाली नसल्याने खापरदरी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार आवाज उठवूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रशासनाला आणखी किती वेळा स्मरण करून द्यावे लागणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तत्कालीन आमदारांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. खापरदरी ते सावरगाव कान्होबा हे साधारण पाच किलोमीटरचे अंतर असून, सावरगाव कान्होबा येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या तीर्थक्षेत्रासह मंगरूळनाथ शहराला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. सावरगाव कान्होबा बाजूकडील रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, खापरदरी हद्दीतील सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा टप्पा अद्याप अपूर्णच आहे.

खापरदरी हद्दीतील संबंधित रस्त्याचे डांबरीकरण अद्याप झाले नाही. रस्ता कच्चा, उबडखाबड व असमतल अवस्थेत असून, ठिकठिकाणी खड्डे आणि मातीमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे अधिक कठीण होते. त्यातच मार्गावरील मोठ्या नाल्यावर अद्याप पूल बांधण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो.
एका बाजूला सावरगावकडील काम पूर्ण, तर दुसर्या बाजूला खापरदरी हद्दीतील काम अपूर्ण, अशी विसंगत परिस्थिती कायम आहे. या रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने यापूर्वी संबंधित विभागाला निवेदन देऊन रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी रस्त्याची पाहणी केली होती. मात्र, निवेदन, वृत्तपत्रांतील प्रसिद्धी आणि अधिकार्यांची पाहणी होऊनही प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. मंजूर रस्त्याचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.