मानोरा,
celebration-of-gratitude-towards-cattle तालुयातील सर्व तांड्यामध्ये दिवाळीच्या दुसर्या दिवशी बंजारा समाजाची पारंपारिक गोधन पूजा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडली. पशुधन आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आजही तांड्यांमध्ये अविरत सुरू असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. दिवाळीच्या दुसर्या दिवशी सकाळपासूनच तांड्यांमध्ये वेगळेच चैतन्य होते. तांड्यातील कुमारीका पारंपारिक वेशभूषेत, एकत्र येऊन पारंपारिक बंजारा लोकगीते गात घरोघरी फिरल्या. त्यांच्या गीतांमधून निसर्ग, पशुधन, शेती आणि समृद्धी याविषयीचा आदरभाव व्यक्त होत होता.या दिवशी तांड्यातील महिला व मुलींनी सामूहिकरीत्या बरु व लांबडा या पवित्र वनस्पती आणल्या.
प्रत्येक कुटुंबातील गोठ्यात गाई-गुरांच्या शेणापासून गोधनाची प्रतिकृती तयार करून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. शेणापासून तयार केलेल्या गोधनावर झेंडूच्या फुलांच्या माळा, हळद-कुंकू, अक्षता वाहून दिवा, अगरबत्तीने आरती करण्यात आली. रांगोळीने गोठा व अंगण सजवण्यात आले होते.पूजेनंतर कुमारीकांनी गाई-गुरांना नैवेद्य दाखवून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सुख-समृद्धी, चांगले पीक-पाणी आणि गुरे-ढोरे निरोगी राहावीत अशी प्रार्थना केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला, मुली व लहान मुले उपस्थित होती.बंजारा समाज हा मुळातच पशुपालक समाज. पूर्वीच्या काळी तांडा म्हणजे फिरते गाव. गाई-गुरेच त्यांची खरी संपत्ती होती. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाबरोबरच गोधन पूजेला विशेष महत्त्व आहे. ही केवळ पूजा नसून पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, अशी भावना यावेळी ज्येष्ठांनी व्यक्त केली.आधुनिकतेच्या काळातही तांड्यातील नवी पिढी ही परंपरा आवडीने जपत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही कुमारीका पारंपारिक गीते शिकून ती गात आहेत, हे विशेष कौतुकास्पद आहे. यामुळे समाजाच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असल्याचे स्पष्ट होत आहे.या पूजेमुळे तांड्यातील एकोपा, सामूहिकता आणि आपुलकी अधिक दृढ होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. शेवटी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन गोडधोड वाटप केले.