नवी दिल्ली,
sonia-gandhi काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील एका अत्यंत भावनिक आणि वेदनादायी प्रसंगाचा खुलासा आत्मचरित्रातून केला आहे. जानेवारी १९६९ मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, मुदतपूर्व जन्म झाल्यामुळे या बाळाचा जन्मानंतर अवघ्या एका दिवसात मृत्यू झाला. या घटनेने सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे.
हार्परकॉलिन्सने प्रकाशित केलेले हे पुस्तक मंगळवारी बाजारात येत आहे. सोनिया गांधी यांनी पुस्तकात सांगितले की, सप्टेंबर १९६८ मध्ये त्या गर्भवती असल्याचे समजल्यानंतर गांधी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. इंदिरा गांधी यांनीही आनंद व्यक्त करत सोनिया यांना प्रेमाने मिठी मारली होती. मात्र, या आनंदाला काही महिन्यांतच दुःखाची किनार लाभली.
सोनिया गांधी यांची प्रसूती अपेक्षित वेळेच्या जवळपास दोन महिने आधीच झाली. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. नवजात बाळाला तातडीने इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकल्याचा प्रसंगही सोनिया यांनी पुस्तकात नमूद केला आहे. राजीव गांधी यांनी त्यांना बाळाची भेट घडवून आणली. लहान असले तरी बाळाचे शरीर पूर्ण विकसित झाले होते. त्याचे दाट काळे केस आणि लांब बोटे पाहून दोघेही भारावून गेले होते. पहिल्याच भेटीत त्यांना बाळाचा लळा लागला होता. मात्र, डॉक्टरांनी त्याच्या जगण्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी यांनी सोनिया यांना बाळाच्या मृत्यूची बातमी दिली. या धक्क्याने दोघेही पूर्णपणे कोलमडून गेले. सोनिया यांनी पुस्तकात त्या प्रसंगाचे वर्णन करताना आपण आणि राजीव दोघेही खूप रडलो, असे म्हटले आहे. त्यावेळी इंदिरा गांधी शहराबाहेर होत्या. नातवाच्या निधनाची बातमी मिळताच त्यांनी आपला दौरा थांबवून रुग्णालय गाठले. त्यांनी सोनिया यांना मिठी मारून त्यांचे सांत्वन केले आणि बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला.
बाळाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्नही कुटुंबासमोर मोठ्या अडचणीचा ठरला. हिंदू परंपरेनुसार नवजात बालकाचा मृतदेह नदीत विसर्जित करण्याची प्रथा असल्याचे सोनिया यांनी नमूद केले आहे. मात्र, आपल्या बाळाला अशा प्रकारे निरोप देण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. ओखला बॅरेज परिसरात मृतदेहाची झालेली दुर्दशा त्यांनी पाहिली होती. त्यामुळे आपल्या मुलाच्या बाबतीत असे काही घडू नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. अखेर मेहरौली येथील फिरोज गांधी यांच्या फार्महाऊसवर बाळाला दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजीव गांधी आणि संजय गांधी यांनी फार्महाऊसच्या सीमाभिंतीजवळ एका गुलाबी बोगनव्हिलियाच्या झुडपाखाली खड्डा खोदून बाळाला दफन केले. त्यानंतर अनेक वर्षे कुटुंबीय जेव्हा त्या ठिकाणी जात असत, तेव्हा बाळाच्या आठवणीप्रीत्यर्थ तिथे फूल ठेवत असत, असेही सोनिया यांनी लिहिले आहे.
या घटनेनंतर सोनिया गांधी यांना बराच काळ मानसिक त्रास सहन करावा लागला. नैराश्य, न्यूनगंड आणि अपराधीपणाची भावना त्यांना सतावत होती. त्यातच एका विरोधी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे त्यांच्या दुःखात आणखी भर पडली. इंदिरा गांधी या अनौरस मुलाच्या आजी होण्यापासून वाचल्या, अशा आशयाची टिप्पणी त्या लेखात करण्यात आली होती. या शब्दांनी आपल्याला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सोनिया यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे.
काळानुसार या दुःखातून त्या सावरू लागल्या. ऑक्टोबर १९६९ मध्ये त्यांनी पुन्हा गर्भवती असल्याची बातमी राजीव गांधी यांना दिली. ही बातमी ऐकून राजीव आनंदी झाले होते, मात्र आधीच्या अनुभवामुळे त्यांच्या मनात काळजीही होती. त्यानंतर १९ जून १९७० रोजी सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना जन्म दिला. अशा प्रकारे आपल्या पहिल्या अपत्याच्या निधनाचा वेदनादायी अनुभव सोनिया गांधी यांनी अनेक वर्षांनंतर आत्मचरित्राच्या माध्यमातून जगासमोर मांडला आहे.