आर्यवीर सेहवागची १६० धावांची धडाकेबाज खेळी!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
aryavir-sehwag यू-१९ आशिया कपमध्ये भारताचा युवा फलंदाज आर्यवीर सेहवागने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावत १६० धावांची मोठी खेळी केली. मात्र, १६८ चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याची खेळी संपुष्टात आली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.
 
aryavir-sehwag
 
या सामन्यात नाणेफेक जिंकून यूएईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य राज चंदानी यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लक्ष्य बाद झाल्यानंतर आर्यवीरने डावाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने १३१ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करत स्पर्धेतील पहिले शतक नोंदवले.
 
माजी भारतीय स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा असलेल्या आर्यवीरने या खेळीदरम्यान गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने १७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १६० धावा फटकावल्या. यापूर्वी नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ७० धावा केल्या होत्या. मात्र, पाकिस्तानविरुद्ध त्याला केवळ २२ धावाच करता आल्या होत्या. आता यूएईविरुद्धच्या शतकामुळे त्याने पुन्हा एकदा आपली फलंदाजीची क्षमता दाखवून दिली.
 
आर्यवीरने व्ही. के. विनीतसोबत दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनी वेगाने धावा जमवत भारतीय संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. आर्यवीरच्या आक्रमक खेळीमुळे भारताने अवघ्या ३८ षटकांत २०३ धावांचा टप्पा गाठला. विनीतनेही फलंदाजीत चांगली साथ दिली.
 
दरम्यान, 'अ' गटातील भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने नेपाळला पराभूत करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. त्या सामन्यात भारताने नेपाळचा डाव १२८ धावांत गुंडाळला आणि एकही विकेट न गमावता विजय मिळवला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या समीकरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यूएईविरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे.