ढाका,
bangladesh violence बांगलादेशातील हिंसाचाराचे सत्र पुन्हा एकदा तीव्र झाले असून राजधानी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ आणि बॉम्बस्फोटांच्या घटना समोर आल्या आहेत. फरिदपूर येथे सोमवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी बसला आग लावली. या वेळी बसमध्ये झोपलेले ६० वर्षीय चालक मोहम्मद कलाचन शेख यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. गोलचमत नवीन बस स्थानकाजवळ ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाला बाहेर काढून फरिदपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याशिवाय झेनायदाह येथील इस्लामिक विद्यापीठाच्या सुमारे ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या 'दिगंता' या डबल डेकर बसवरही पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. शैलकुपा उपविभागातील ड्रॅगन बागान परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, ढाका, सावर आणि गाझीपूर परिसरातही बस जाळण्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. 'द डेली स्टार'च्या वृत्तानुसार, सोमवारी या भागांमध्ये एकूण सहा बसेस पेटवून देण्यात आल्या. सावरमध्ये ढाका-आरिचा महामार्गालगत गेंडा आणि बलियारपूर येथे पहाटे अनुक्रमे १ आणि ४ वाजता दोन बसेसना आग लावण्यात आली. यातील एका बसचा वापर कापड गिरणीतील कामगारांच्या वाहतुकीसाठी केला जात होता, तर दुसरी बस 'इतिहास परिवहन'ची होती. ढाक्यातील फार्मगेट मेट्रो स्टेशनखाली 'लवली परिवहन'च्या बसला, तर मिरपूर-११ येथे 'बसुमती परिवहन'च्या बसला आग लावण्यात आली. गाझीपूरमधील कालियाकैर उपजिल्ह्यातील चंद्र परिसरातही दोन बसेस जाळण्यात आल्या. यासोबतच ढाक्यातील मोहम्मदपूर येथील टोकियो स्क्वेअरसमोर रात्री ९.१५ वाजता दोन बॉम्बस्फोट झाले. बानाश्री, मोहखली, ढाका विद्यापीठ परिसर आणि मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाबाहेरही कच्चे बॉम्ब फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ढाका महानगर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे. राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी १६० नवीन तपासणी नाके उभारण्यात आले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी मागील २४ तासांत १९ जणांना अटक केली आहे. ढाका महानगर पोलिसांचे माध्यम विभागाचे उपायुक्त अख्तर हुसेन यांनी 'द डेली स्टार'शी बोलताना या अटकेची माहिती दिली.bangladesh violence दरम्यान, हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने बांगलादेशातील परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे.