नागपूर,
bjym-protests-against-sonia-gandhi काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली जात असल्याचे टीव्हीवर पाहताना आपल्याला अश्रू अनावर झाल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरतर्फे मंगळवारी (१० नोव्हेंबर) रामनगर येथील बाजीप्रभू देशपांडे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजप युवा मोर्चाचे नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले. यावेळी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे आपला निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.