गोंदिया,
goregaon मोबाईल दुकानाचे शटर तोडून तब्बल ३७ अँड्रॉइड मोबाईल चोरी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे सर्व ३७ मोबाईल हँडसेट, असा एकूण ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बुज. येथील सोमेंद्र छगनलाल पटले यांच्या मोबाईल दुकानात चोरी झाल्याचे ७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी पटले यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला. ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोरेगाव व डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबर्याच्या आधारे या चोरीत सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथील एका विधिसंघर्ष बालकासह त्याच्या दोन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने साकोली तालुक्यातील किन्ही-मोखे येथे जाऊन तिन्ही संशयित विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गोरेगाव येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे मोबाईल एका शाळेच्या दप्तरात लपवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी एका विधिसंघर्ष बालकाच्या घरातून दप्तरात ठेवलेले विविध कंपन्यांचे ३७ अँड्रॉइड मोबाईल पंचांसमक्ष जप्त केले. या सर्व मोबाईलची किंमत ५ लाख २५ हजार रुपये आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.