मुंबई,
Chhath Puja at Mumbai's Girgaon Chowpatty मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव चौपाटीवर छठपूजेचे आयोजन करण्याची मागणी करणाऱ्या मिथिला छठ पूजा संघाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. चौपाटीवर छठपूजेसाठी मंच उभारणे आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी, यासाठी संघाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. भारत हा विविध धर्म आणि श्रद्धांचा देश असून प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर छठपूजेचे आयोजन करण्याच्या संघाच्या प्रयत्नांना यश आले नाही.

या प्रकरणाची सुरुवात १७ सप्टेंबर २०२६ रोजी झाली होती. त्यावेळी डी. बी. मार्ग पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर छठपूजेच्या आयोजनासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता. यासाठी पोलिसांनी १९९८ मधील उच्च न्यायालयाच्या एका जुन्या आदेशाचा आधार घेतला. या आदेशानुसार गिरगाव चौपाटीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामलीला, कृष्णलीला आणि ख्रिसमस यांसारख्या ठरावीक उत्सवांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. या निर्णयाला आव्हान देत मिथिला छठ पूजा संघाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात धाव घेतली. यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
सुनावणीदरम्यान राज्य सरकारने २०१८ मधील 'आदर्श चौपाटी प्रगती मंडळ' प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ दिला. गिरगाव चौपाटीवर कोणते कार्यक्रम आयोजित करता येतील, याबाबत उच्च न्यायालयाने यापूर्वीच काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यामुळे नव्याने परवानगी देताना या निर्देशांचा विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका सरकारने मांडली. अखेर न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच सार्वजनिक व्यवस्था आणि आधीच्या न्यायालयीन आदेशांचे महत्त्व अधोरेखित करत याचिका फेटाळली. त्यामुळे यंदा गिरगाव चौपाटीवर छठपूजेचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग बंद झाला आहे.