पंजाबमध्ये पराटी जाळण्याचा विक्रम; अनेक शहरांचा AQI ५०० पार!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
पटियाला,
cotton stalk burnings in Punjab दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर उत्तर भारतातील वायुप्रदूषणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष अर्थात पराटी जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, एकाच दिवसात तब्बल १,१५२ ठिकाणी आगी लागल्याची नोंद झाली आहे. फटाक्यांचा धूर, रस्त्यांवरील धूळ आणि बांधकामांमुळे हवेत आधीच प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते. त्यात पराटी जाळण्याच्या घटनांची भर पडल्याने अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिवाळीदरम्यान पराटी जाळण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४०० पट वाढ झाली आहे. २०२४ मध्ये दिवाळीदरम्यान अशा ४८४ घटना नोंदवण्यात आल्या होत्या, तर २०२५ मध्ये ही संख्या केवळ २५ होती. यंदा मात्र १,१५२ ठिकाणी पराटी जाळण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मागील वर्षी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे धानपिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पराटी जाळण्याच्या घटनाही कमी झाल्या होत्या. मात्र, यंदा या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी जालंधर, अमृतसर आणि लुधियाना या शहरांमध्ये कमाल AQI ५०० च्या पुढे नोंदवण्यात आला.
 
 
 
cotton stalk burnings in Punjab
 
दरम्यान, दिवाळीच्या फटाक्यांमुळे दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रदूषणातही मोठी वाढ झाली. या भागांतील अनेक शहरांचा AQI ३५० च्या पुढे गेल्याने हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' श्रेणीत पोहोचली. दिल्लीमध्ये यंदाची दिवाळी मागील पाच वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित ठरली असून, येथील सरासरी AQI ३७६ नोंदवण्यात आला. स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांच्या मते, फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली असली, तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषित कण वातावरणात अधिक काळ टिकून राहिले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे सोमवारी AQI ५६५ वर पोहोचला. विशेष म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी हा आकडा ३०० च्या खाली होता. कोलकात्यात दिवाळीच्या रात्री प्रदूषणाने ६२३ चा धोकादायक स्तर गाठला. शनिवारी हा आकडा १९० होता, तर सोमवारी सायंकाळी सहा वाजता तो १५० वर आला.
 
 
उत्तर भारतातील डोंगराळ भागांनाही या प्रदूषणाचा फटका बसला आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे दिवाळीच्या दिवशी AQI २७२ नोंदवण्यात आला, तर एक दिवस आधी तो १५७ होता. हरिद्वारमध्येही AQI ११५ वरून १६८ पर्यंत वाढला. हिमाचल प्रदेशातील सोलन येथे दिवाळीच्या दिवशी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४०३ वर पोहोचला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यात घट होऊन तो २०२ वर आला. काही शहरांमध्ये दुसऱ्या दिवशी प्रदूषणाची पातळी कमी झाली असली, तरी पंजाबमधील पराटी जाळण्याच्या घटनांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. फटाक्यांचा धूर आणि शेतीतील अवशेष जाळण्याच्या प्रकारांमुळे उत्तर भारतातील नागरिकांना प्रदूषित हवेत श्वास घेण्याची वेळ आली आहे.