दिवाळीच्या आनंदावर विरजण!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
मुंबई
divyanka tripathi
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या कुटुंबावर दिवाळीच्या सणात दुःखाचा मोठा आघात झाला. दिवाळीच्या आदल्या रात्री मुंबईतील त्यांच्या निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या वेळी दिव्यांका, विवेक, त्यांची जुळी मुले, कुटुंबीय आणि घरातील कर्मचारी इमारतीत उपस्थित होते. आगीचा धोका वेळीच लक्षात आल्याने सर्वांनी सुरक्षितपणे इमारतीबाहेर पडण्यात यश मिळवले. मात्र, या दुर्घटनेत इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दिव्यांका आणि विवेक यांना मोठा मानसिक धक्का बसला असून, अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे.

दिव्यांकाने १० नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर आगीचे काही व्हिडीओ प्रसिद्ध केले आणि घडलेल्या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी, दिवाळीच्या आदल्या रात्री घडली. विशेष म्हणजे, त्याच वेळी पती विवेकच्या वाढदिवसाची पूर्वसंध्याही होती. त्या दिवशी कुटुंबीयांनी बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, काही कारणांमुळे बाहेर जाण्याचा बेत वारंवार पुढे ढकलला जात होता. परिणामी, संपूर्ण कुटुंब घरीच थांबले होते.

इमारतीमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता लहान मुलांसह घरातील सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेत बाहेर धाव घेतली. सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. सुरुवातीला कोणतीही जीवितहानी न होता आपण सुरक्षित बाहेर पडल्याचा दिलासा कुटुंबीयांना मिळाला होता. मात्र, काही वेळाने इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांचा आगीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही बातमी समजताच दिव्यांका आणि विवेक यांना मोठा धक्का बसला.



या दुर्घटनेनंतर दिव्यांकाने धनपत अंकल यांच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्रीने सांगितले की, त्यांच्या जुळ्या मुलांना पहिल्यांदा घरी आणले, तेव्हा त्यांचे स्वागत करणाऱ्या आणि आशीर्वाद देणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये धनपत अंकल यांचा समावेश होता. ते केवळ इमारतीचे सुरक्षारक्षक नव्हते, तर कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते. त्यांच्यावर कुटुंबाचा पूर्ण विश्वास होता. मुलं मोठी होत असताना धनपत अंकल त्यांच्यासोबत खेळतील, त्यांच्या बालपणातील अनेक क्षणांचे साक्षीदार होतील, अशा अनेक आठवणी आणि अपेक्षा कुटुंबाने मनात जपल्या होत्या. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे या सर्व कल्पना अपूर्ण राहिल्याची खंत दिव्यांकाने व्यक्त केली.

'काही नुकसान आपल्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण करतात, जी कधीही भरून काढता येत नाही,' अशा हृदयस्पर्शी शब्दांत तिने आपल्या पोस्टची सुरुवात केली. धनपत अंकल यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ती आणि विवेक यांना त्यावर विश्वास ठेवणेही कठीण झाले होते. मित्राच्या घरी आश्रय घेतल्यानंतरही ही बातमी खरी नसावी, असेच दोघांना वाटत होते. ही घटना स्वीकारण्याची मानसिक तयारीच त्यांची झाली नव्हती, असे तिच्या पोस्टमधून स्पष्ट होते.

दिवाळीच्या दिवशी इमारतीचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर सुरक्षेची आवश्यक तपासणी पूर्ण करून गॅसपुरवठा आणि लिफ्टची सुविधाही पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे इमारतीतील दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आले. घरातील दिवे पुन्हा उजळले असले, तरी धनपत अंकल यांच्यासारख्या आपुलकीच्या व्यक्तीला गमावल्याची वेदना कधीही कमी होणार नाही, अशी भावना दिव्यांकाने व्यक्त केली.

दिवाळीचा सण, विवेकचा वाढदिवस आणि कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण अशा पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेने दिव्यांका-विवेक यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक आघात दिला. स्वतःसह कुटुंबातील सर्वजण सुरक्षित बचावल्याचा दिलासा असला, तरी धनपत अंकल यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांच्या मनात कायम राहणार आहे.