एनव्हिडियाच्या सीईओभोवती गुप्तहेरगिरीचे वादळ

एफबीआय तपासाच्या तयारीत?

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
espionage allegations surrounds Nvidia CEO जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांना कथित गुप्तहेर प्रकरणाचा मोठा आर्थिक फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. सोमवारी अमेरिकी शेअर बाजारात एनव्हिडियाच्या समभागांमध्ये व्यवहारादरम्यान ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या घसरणीमुळे हुआंग यांच्या संपत्तीत तब्बल ६.४७ अब्ज डॉलरची घट झाली असून, त्यांची एकूण संपत्ती आता १४८ अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी अमेरिकी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक एस अँड पी ५०० आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नॅस्डॅकमध्ये सकाळच्या व्यवहारात जवळपास २ टक्क्यांची वाढ नोंदवली जात होती. बाजारातील सकारात्मक वातावरण असूनही एनव्हिडियाच्या समभागांमध्ये झालेली घसरण चर्चेचा विषय ठरली. कंपनीचे प्रमुख जेन्सेन हुआंग यांच्याशी संबंधित कथित प्रेमसंबंध आणि गुप्तहेरगिरीच्या आरोपांबाबतच्या वृत्तांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 

surrounds Nvidia CEO
 
या प्रकरणात एलिस हुआंग नावाच्या चिनी महिला व्यावसायिकाचे नाव समोर आले आहे. ती यापूर्वी सिंगापूरमधील 'मेगास्पीड' या तंत्रज्ञान पुरवठा कंपनीत काम करत होती. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या आरोपानुसार, एलिस हुआंगचे चीनच्या सरकारी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असून, तिने जेन्सेन हुआंग यांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एनव्हिडियाच्या H100 आणि B200 या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चिप्सपर्यंत पोहोच मिळवणे हा या कथित कारवाईमागील उद्देश असल्याचा आरोप आहे. या चिप्सच्या चीनला होणाऱ्या विक्रीवर अमेरिकी सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका व्यावसायिकाच्या वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित न राहता अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही जोडले गेले आहे. एनव्हिडियाच्या चिप्सचा वापर अमेरिकी लष्कर आणि एआय सुपरकॉम्प्युटिंग क्षेत्रात महत्त्वाच्या कामांसाठी केला जात असल्याने या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
 
 
दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला (एफबीआय) तपासाचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. एफबीआयच्या काउंटर इंटेलिजन्स विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडींचा परिणाम एनव्हिडियाच्या शेअर बाजारातील कामगिरीवरही दिसून आला. सोमवारी कंपनीचा समभाग घसरून १७२.३७ डॉलरच्या नीचांकी स्तरावर पोहोचला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या समभागांमध्ये २२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ९ ऑक्टोबर रोजी एनव्हिडियाचा समभाग २२९.२८ डॉलरवर बंद झाला होता. त्यानंतर सोमवारी तो १७२.३७ डॉलरपर्यंत खाली आल्याने प्रति समभाग ५६.९१ डॉलरची घट नोंदवण्यात आली. मात्र, या कथित गुप्तहेर प्रकरणातील आरोप आणि तपासाचे निष्कर्ष अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत.