१६ मतांसह महायुतीचा विजय गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
कोल्हापूर
rajesh patil
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत अध्यक्षपदावर विजय मिळवला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. गोकुळच्या संचालक मंडळात सर्वाधिक जागा जिंकूनही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला अध्यक्षपद मिळवता आले नाही.


गोकुळच्या २५ संचालकपदांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत बहुमत मिळवले होते. दुसरीकडे महायुतीच्या वाट्याला १२ जागा आल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक समविचारी आघाडीसाठी अनुकूल मानली जात होती. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने चार नामनिर्देशित संचालकांची नियुक्ती केली. या संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आल्याने गोकुळमधील सत्तेचे गणित बदलले. परिणामी, निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या समविचारी आघाडीला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले.

या नामनिर्देशित संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून निवडणुकीपूर्वीच दोन्ही गटांमध्ये कायदेशीर संघर्ष निर्माण झाला होता. शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू देऊ नये, अशी मागणी सतेज पाटील यांच्या गटाने केली होती. यासंदर्भात समविचारी आघाडीच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवण्यात आला होता. या चार संचालकांच्या मतदानाला विरोध करत सतेज पाटील यांनी न्यायालयातही धाव घेतली होती.

या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने शासननियुक्त संचालकांची चार मते स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश दिले. या मतांबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चार नामनिर्देशित संचालकांच्या मतदानाचा मुद्दा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महत्त्वाचा ठरला.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी यापूर्वी बोलावण्यात आलेली पहिली बैठक गणपूर्तीअभावी तहकूब करावी लागली होती. या बैठकीला समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक उपस्थित होते; मात्र महायुतीच्या १२ संचालकांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेली १४ संचालकांची गणपूर्ती पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी बैठक स्थगित केली होती. त्यानंतर राज्य सरकारने मतदानाचा अधिकार असलेल्या चार नामनिर्देशित संचालकांची नियुक्ती केली. या घडामोडींमुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला वेगळे वळण मिळाले.

शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. मागील कार्यकाळातही त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. त्यावेळी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असतानाच राज्यातील राजकीय समीकरणांचा परिणाम गोकुळच्या सत्ताकारणावर झाला. अखेर चुयेकर यांच्याऐवजी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावेद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. अध्यक्षपद मिळण्याच्या अपेक्षेने चुयेकर यांनी घराबाहेर मंडपही उभारला होता; मात्र निवडीचे समीकरण बदलल्याने त्यांना तो मंडप हटवावा लागला होता. आता संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवूनही अध्यक्षपदाने त्यांना पुन्हा हुलकावणी दिली आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. संभाव्य तणाव लक्षात घेऊन गोकुळच्या कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेरच्या मतदान प्रक्रियेनंतर महायुतीचे राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत अध्यक्षपद पटकावले, तर शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मते मिळाली. संचालक मंडळातील संख्याबळ, शासननियुक्त सदस्यांचा मतदानाचा अधिकार आणि न्यायालयीन हस्तक्षेप या सर्व घडामोडींमुळे गोकुळची अध्यक्षपदाची निवडणूक कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील चर्चेचा विषय ठरली आहे.