मुंबई
gold silver price दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर कमी झाले आहेत. मात्र, चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, पाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर उतरल्याने दागिने किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४९० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ४४ हजार ११० रुपये मोजावे लागत आहेत. तर १० तोळे म्हणजेच १०० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ४ हजार ९०० रुपयांची घसरण झाली असून, त्याचा दर १४ लाख ४१ हजार १०० रुपयांवर आला आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत झालेली ही कपात ग्राहकांसाठी खरेदीची संधी मानली जात आहे.
२४ कॅरेटसोबतच दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ४५० रुपयांची घट झाली असून, आजचा दर १ लाख ३२ हजार १०० रुपये आहे. तर १० तोळे सोन्याच्या किमतीत ४ हजार ५०० रुपयांची कपात होऊन हा दर १३ लाख २१ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. या प्रकारच्या सोन्याच्या १० ग्रॅममागे ३७० रुपयांची कपात नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ८ हजार ८० रुपये झाला आहे. तर १० तोळे म्हणजेच १०० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १० लाख ८० हजार ८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दुसरीकडे, सोन्याच्या किमतीत घसरण झाली असली तरी चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज बाजारात एक ग्रॅम चांदीचा भाव २०५ रुपये असून, एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २ लाख ५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांना दरातील घसरणीचा फायदा मिळणार असला, तरी चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीइतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे.
सोन्याच्या तिन्ही प्रकारांच्या दरात झालेल्या घसरणीमुळे पाडव्याच्या दिवशी दागिने किंवा भेटवस्तू खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी करताना शहर, सराफा बाजार, जीएसटी आणि घडणावळीनुसार अंतिम किंमत बदलू शकते.