नवी दिल्ली,
indias-match-ends-in-a-draw-due-to-rain भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यात खेळवण्यात आलेला तिसरा आणि अखेरचा अनधिकृत कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला. सलग पावसामुळे सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी एकही षटकाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सरावाची अपेक्षित संधी मिळाली नाही.
या सामन्यात भारत 'अ' संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून ४६४ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड 'अ' संघाला खराब हवामानामुळे फार काळ फलंदाजी करता आली नाही. खेळ थांबवण्यात आला, तेव्हा न्यूझीलंडची अवस्था १४ षटकांत दोन बाद ३६ धावा अशी होती.
आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजा यांना या सामन्यातून गोलंदाजीचा सराव मिळणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे त्यांच्या तयारीवर परिणाम झाला. बुमराहने सहा षटके गोलंदाजी करत ११ धावा दिल्या, परंतु त्याला एकही बळी मिळवता आला नाही. प्रसिद्ध कृष्णाने मात्र पाच षटकांत १२ धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. जडेजाला तर गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.
फलंदाजीच्या आघाडीवर भारतासाठी यशस्वी जयस्वालने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात १०७ धावांची शतकी खेळी साकारली. सुरुवातीच्या तीन डावांमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर जयस्वालने सलग दोन शतके झळकावत दमदार पुनरागमन केले आहे. याशिवाय साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनीही या सराव सामन्यांमध्ये फलंदाजीचा चांगला सराव केला.
दरम्यान, भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यातील तीन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील तिन्ही सामने अनिर्णित राहिले. लिंकन येथे झालेला पहिला सामना चार दिवसांच्या खेळानंतर बरोबरीत सुटला होता. त्यानंतर क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या सामन्याचाही निकाल लागला नव्हता. आता तिसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणल्याने मालिकेचा शेवट कोणत्याही निकालाविना झाला.