विराटचा तो फोन अन् केन विल्यमसनचा क्रिकेटला अलविदा!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Kane Williamson bids farewell to cricket न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागील कारणांचा पहिल्यांदाच खुलासा केला आहे. जून २०२६ मध्ये तब्बल १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलेल्या विल्यमसनसाठी हा केवळ क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय नव्हता, तर आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलण्याचा महत्त्वाचा टप्पा होता. विशेष म्हणजे, निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याशी फोनवर संवाद साधला होता. या चर्चेने आपल्या मनातील विचार अधिक स्पष्ट झाल्याचे विल्यमसनने सांगितले. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने या प्रसंगाची आठवण सांगितली. त्याच्या मते, दोघांनीही आपल्या क्रिकेटमधील प्रवासातील अनुभव, कर्णधारपदाची जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्यातील बदल यावर चर्चा केली. त्यामुळे विराटसोबतचा संवाद त्याच्यासाठी स्वतःच्या निर्णयाकडे नव्याने पाहण्यासारखा ठरला.
 
 
 
Kane Williamson
 
केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. १६ वर्षांच्या प्रवासात त्याने न्यूझीलंडकडून एकूण १९,३४६ धावा केल्या. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज म्हणून त्याची नोंद आहे. त्याच्या नावावर ४८ शतके आणि दोन द्विशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत ९,५१५ धावा आणि ३३ शतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी तो केवळ ४८५ धावा दूर होता. मात्र, या महत्त्वपूर्ण विक्रमाच्या अगदी जवळ असतानाही त्याने निवृत्ती स्वीकारली. विशेष म्हणजे, विराट कोहलीनेही २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्याच्या नावावर ९,२३० कसोटी धावा होत्या. दोघांच्या कारकिर्दीत कर्णधारपद आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक समान अनुभव असल्याचे विल्यमसनने नमूद केले. विराटसोबतच्या चर्चेचा उल्लेख करताना तो म्हणाला की, काही जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींशी निवृत्तीबाबत चर्चा केल्यानंतर त्याने विराटशी संवाद साधला. हा संवाद स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब पाहण्यासारखा होता. दोघेही वेगवेगळ्या देशांसाठी खेळत असले, तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव समान होते.
 
 
निवृत्तीचा निर्णय घेण्यामागे केवळ क्रिकेटमधील कामगिरी किंवा वय हे कारण नव्हते, तर बदलत्या जीवनशैलीचा आणि प्राधान्यक्रमांचा त्यावर प्रभाव होता, असे विल्यमसनने स्पष्ट केले. सलग १६ वर्षे स्वतःची आणि संघाची कामगिरी सुधारण्यासाठी दररोज मेहनत घेतल्यानंतर एका टप्प्यावर खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. याबाबत तो म्हणाला की, एखाद्या खेळावर अनेक वर्षे मनापासून प्रेम करता येते आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावता येते; मात्र आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा त्या गोष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. केवळ पूर्वीच्या सवयी किंवा कारणांसाठी खेळ सुरू ठेवणे योग्य वाटत नव्हते. घाईघाईने निर्णय घेण्याची इच्छा नव्हती, परंतु क्रिकेटकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलत असल्याची जाणीव झाली होती. विराट कोहलीसोबत झालेल्या चर्चेनंतर त्याने पत्नीशीही निवृत्तीबाबतचे विचार स्पष्ट केले. अशा प्रकारे १० हजार कसोटी धावांच्या ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर असतानाही विल्यमसनने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सांगता करण्याचा निर्णय घेतला.