इझमीर,
massive-explosion-at-a-steel-plant-in-turkey तुर्कस्तानमध्ये सोमवारी एका पोलाद कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने मोठी दुर्घटना घडली. स्फोटानंतर कारखान्यात लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तुर्कस्तानमधील इझमीर प्रांतातील अलीगा येथे असलेल्या हबास स्टील प्लांटमध्ये ही घटना घडली. कारखान्यातील बॉयलर बदलण्याचे काम सुरू असताना क्रेन थेट भट्टीत कोसळली. त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर कारखान्यात आग पसरली, अशी प्राथमिक माहिती प्रांतीय प्रशासनाने दिली आहे. इझमीरचे गव्हर्नर सुलेमान अल्बान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयलर बदलण्याच्या कामामुळे कारखान्यातील उत्पादन आधीच बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेहमीच्या ३०० कर्मचाऱ्यांऐवजी दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी सुमारे २०० कर्मचारी उपस्थित होते.
या घटनेनंतर तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दूरचित्रवाणीवरून जनतेशी संवाद साधला. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. स्फोटामागील नेमकी कारणे शोधण्यासोबतच कारखान्यात कोणाकडून निष्काळजीपणा झाला का आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे, याचाही तपास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची न्यायालयीन आणि प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, हबास स्टील प्लांटची स्थापना १९८७ मध्ये करण्यात आली होती. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, या कारखान्याची वार्षिक पोलादनिर्मिती क्षमता ४५ लाख टन इतकी आहे. या मोठ्या औद्योगिक दुर्घटनेने तुर्कस्तानमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.