मुंबई
mumbai fire incidents दिवाळीच्या उत्साहावर मुंबईत घडलेल्या आगीच्या घटनांमुळे विरजण पडले आहे. सोमवारी रात्री शहरातील तब्बल पाच ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. फटाक्यांमुळे कुठे घरांना, तर कुठे दुकानांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मालाडमधील आगीच्या दुर्घटनेत एका १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शनवाज नियाज खान असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेने दिवाळीच्या आनंदाला गालबोट लागले आहे.

मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ही भीषण दुर्घटना घडली. मालवणीतील गेट क्रमांक ८, अब्दुल हमीद मार्ग परिसरातील तळमजल्यावर असलेल्या एका दुकानाला आग लागली होती. साधारण २० बाय ३० फुटांच्या परिसरात ही आग पसरली. याचदरम्यान फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर एक मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तो दुकानात मृतावस्थेत आढळून आला. आगीत त्याचे शरीर पूर्णपणे होरपळले होते. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र या घटनेत त्याचा मृत्यू झाला. शनवाज नियाज खान या १६ वर्षीय मुलाच्या मृत्यूने मालवणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री मुंबईत मालवणीसह अन्य चार ठिकाणीही आगीच्या घटना घडल्या. दहिसरच्या कांदरपाडा परिसरात रात्री आग लागली. आरबीआय कॉलनीमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर, गुंदेचा शाळेजवळ ही आग भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
धारावीतील एका इमारतीतही आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत वेळेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर चुनाभट्टी परिसरात रात्री सुमारे २ वाजून ४० मिनिटांनी साईनाथ सेवा मंडळाच्या व्यायामशाळेतील प्लास्टिकच्या शेडला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, चुनाभट्टी पोलीस आणि मंगलमूर्ती कॅटर्सच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत आग विझवली.
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीतही रात्री आग लागली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या पाच घटनांपैकी मालवणीतील दुर्घटनेत एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. इतर चार ठिकाणी लागलेल्या आगींमध्ये कोणालाही दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दिवाळीच्या रात्री एकाच शहरात घडलेल्या या आगीच्या घटनांमुळे फटाक्यांच्या वापरादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.